बार्शी तालुक्यातील गावांचा सर्वांगीन विकास साध्य करण्याच्या दिशेने या प्रतिष्ठान मार्फत पथदर्शक स्वरूपात दरवर्षी पाच गावाची निवड केली जाते. त्या गावातील ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहभागातुन खालील उपक्रम राबविले जातात.
१. पिण्याच्या पाण्यासाठी जलशुध्दिकरण (आर.ओ. प्लांट) उभारणे.
२. जलसंवर्धनासाठी पाणी आडविण्याचे विविध उपाय, योजना करणे.
३. पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवडीसाठी मदत करणे.
४. लहान मुलांना खेळण्यासाठी शाळेच्या आवारात खेळणी बसविणे.
५. बालवाडीतील मुला-मुलींना मोफत तपासणीसाठी आरोग्य कार्ड देणे.
६. गावच्या बस थांब्यावर महिलांसाठी निवारा शेड उभी करणे.
७. विकलांग व निराधार स्त्री-पुरूषांना दोन वेळचे जेवण मोफत पुरविणे.
८. मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजीत करणे.
९. भगवंत महोत्सव (गावची जत्रा) साजरा करणे.
१०. बौध्दिक व्याख्यानमाला आयोजीत करणे.
१. पिण्याच्या पाण्यासाठी जलशुध्दिकरण (आर.ओ. प्लांट) उभारणे.
माणसाला होणारे बरेचसे आजार हे केवळ अशुध्द पाणी पिण्यामुळे होतात ही वस्तुस्थिती आहे. महापालिका व नगरपालिका हद्दीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी प्रक्रिया करून दिले जाते, मात्र ग्रामीण भागात ग्रामपंचायती कडे अशाप्रकारची सुविधा उपलब्ध नसते , म्हणुन ग्रामीण भागात दुषीत पाणी पिल्यामुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण जास्त आहे. म्हणुन ही समस्या सोडविण्यासाठी प्रतिष्ठान मार्फत अनुदान देऊन दरवर्षी पाच गावामध्ये असे प्लांट बसविले जातात. त्यानुसार दोन वर्षात आतापर्यंत अकरा गावात असे प्लांट बसविले आहेत.
ताशी २५० लिटर पाणी शुध्द करणाऱ्या प्लांटला सुमारे १२५००० रूपये खर्च येतो. त्यामध्ये प्रतिष्ठान रूपये २५,००० अनुदान देते. तसेच ताशी ५०० लिटर पाणी शुध्द करनाऱ्या प्लांटचा खर्च सुमारे १७५००० येतो . त्यासाठी प्रतिष्ठान मार्फत रू.५०००० अनुदान देण्यात येते. त्या प्लांटसाठी लागणारी जागा व पाणी ग्रामपंचायतीने मोफत देण्याचे आहे. लाभार्थींना ५ रुपयामध्ये २० लिटर पाणी देण्यात येते आणी त्यामधुन प्लांट चालविण्यासाठी येणारा खर्च भागविला जातो. यानुसार या योजनेचा लाभ सध्या अकरा गावातील जनता घेत आहे.
[nggallery id=1]
२. जलसंवर्धनासाठी पाणी आडविण्याचे विविध उपाय योजना करणे.
शासनाने जी जलयुक्त शिवार योजना जाहीर केली आहे, त्यांचे आव्हानाला प्रतिसाद म्हणुन प्रतिष्ठानने निवडलेल्या अकरा गावात पोकलेन व जेसीबी प्रत्येक गावात ५० तास मोफत चालविला जातो. त्यानुसार मागील वर्षात या माध्यमातुन पाच गावात गावकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.
[nggallery id=7]
३. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवडीसाठी मदत करणे.
पर्यावरणाचा योग्य समतोल राखण्यासाठी एकुण ३३ टक्के भुभाग वनाखाली असणे आवश्यक आहे. त्यातुलनेमध्ये महाराष्ट्र राज्य व सोलापुर जिल्हयातील वनाखालील क्षेत्राचे प्रमाण केवळ २० टक्के व ०.३ टक्के आहे. पर्यावरणाचा योग्य समतोल न राखल्यामुळे आवर्षन /दुष्काळ, तपमानातील वाढ, अवेळी पाऊस /गारपीट अशा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत, या समस्येवर मात करण्यासाठी सामाजीक वनीकरण विभागाच्या सहकार्याने तसेच प्रतिष्ठानच्या स्वतःच्या पैशातुन वृक्ष लागवडीस मोठया प्रमाणावर प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे, त्यानुसार २०१४-१५ यावर्षामध्ये प्रतिष्ठानने पाच गावामध्ये २५०० केशर आंब्याची रोपे वाटली असुन लागवड करून घेतली आहे. यापुढेही दरवर्षी २५०० रोपे वाटण्याचा संकल्प केलेला आहे.
[nggallery id=2]
४. लहान मुलांना खेळण्यासाठी शाळेच्या आवारात खेळणी बसविणे.
ग्रामीण भागामध्ये खेळले जाणारे जुने खेळ उदा. आटयापाटया , विटी दांडु, सुरपारंब्या ,इ. मुलांचे खेळ काळाच्या ओघात लोप पावलेले आहेत आणी त्याची जागा टि.व्ही. ने व्यापली आहे. शहरी भागामध्ये शाळेच्या मैदाानावर किंवा बागेमध्ये मुलांना खेळण्यासाठी घसरगूंडी , झोका, सिसॉ, रेन्बो अशी साधने उपलब्ध आहेत. मात्र ग्रामीण भागामध्ये ती उपलब्ध नाहीत म्हणुन मुलांची कुचंबना होते ती दुर करणेसाठी आम्ही ज्या गावामध्ये शुध्दपाण्याचा प्लांट लावतो, त्यागावात शाळेच्या मैदानावर वरील प्रकारची चार खेळणी उपलब्ध करून देतो. आतापर्यंत दहा गावामध्ये याची पुर्तता झाली असुन खेडयातील लहान मुले त्याचा आनंद लुटत आहेत.
[nggallery id=4]
५. बालवाडीतील मुला मुलींना मोफत तपासणी साठी आरोग्य कार्ड देणे.
ग्रामीण भागात सरकारने बालवाडया चालु केल्या आहेत, त्यांना पोषण आहारहि दिला जातो, त्यातुलनेमध्ये त्यांच्या आरोग्याची (दवापाण्याची) योग्य ती सोय नसते. ही गरज ओळखुन आमचे प्रतिष्ठानच्या सदस्यापैकी जे लहान मुलांचे डॉक्टर आहेत अशा सदस्यांनी त्या मुलांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याची तयारी दाखविल्यामुळे आम्ही निवडलेल्या अकरा गावात बालवाडीतील मुलांना मोफत आरोग्य कार्ड दिली आहेत. त्यांचेवरती प्रतिष्ठानचे तीन डॉक्टर मोफत उपचार करीत असतात.
[nggallery id=3]
६. गावच्या बस थांब्यावर महिलांसाठी निवारा शेड उभे करणे.
शासनाने गाव तिथे रस्ता व रस्ता तिथे एस.टी. या योजनेनुसार ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय केली आहे. बस थांब्यावरती एखादे दुसरे हॉटेल असते, पुरूष मंडळी त्या हॉटेलच्या बाकावर बसु शकतात, मात्र महिला भगिनींना बसण्यासाठी निवारा किंवा सावली नसते.म्हणुन त्यांची कुचंबना होते. ती टाळण्यासाठी प्रतिष्ठानने बार्शी रोटरी क्लबच्या माध्यमातुन प्रत्येक गावात अशी शेड उभी करण्याचा संकल्प केला असुन आतापर्यंत अशा अकरा गावात निवारा शेड उभी केली आहेत.
[nggallery id=5]
७. विकलांग व निराधार स्त्री-पुरूषांना दोन वेळचे जेवण मोफत पुरविणे.
वरील सोयी करण्याच्या निमीत्ताने आम्ही ग्रामीण जीवन जवळुन पाहिल्यानंतर आमचे असे लक्षात आले की, खेडयामध्ये सुध्दाा वेगवेगळया कारणामुळे वृध्द स्त्री-पुरूषांना दोन वेळचे जेवण सुखासुखी मिळत नाही. त्याच्या कारणामध्ये खोलवर न जाता अशा लाभार्थीचा शोध घेऊन आम्ही वरील अकरा गावामध्ये प्रत्येकी २० लाभार्थींना मोफत दोन वेळचे जेवण मोफत देण्याचा संकल्प केला होता, त्यानुसार आतापर्यंत खामगाव,सुर्डी,गोरमाळे यागावात ही योजना चालू केली आहे.
ग्रामीण भागामध्ये अशी योजना चालु केल्यानंतर आमचे काही सभासदांच्या लक्षात आले की, बार्शी शहरामध्ये सुध्दा दोन वेळचे जेवण सुखाने मिळत नाही म्हणुन अनेक वृध्द उपाशी राहत आहेत, म्हणुन बार्शी शहरामध्ये अशा शंभर लाभार्थींची निवड करून सध्या दोनवेळचे पुरेल एवढे अन्न एकाच वेळेला सकाळी १०.०० वाजता घरपोच दिले जाते.त्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी एक स्वयंपाक घराची निर्मीती केली असुन स्वयंपाक करण्यापासुन ते जेवण घरपोच देण्यापर्यंत दहा माणसांची टिम काम करते. एका लाभार्थीला एका वर्षाला सुमारे ७५०० एवढा खर्च येणार असे गृहीत धरून समाजातील सुस्थीतीत जगणाऱ्या व आर्थिक सुबत्ता असणाऱ्या दानशुरांनी ७५०० च्या पटीमध्ये शक्य तेवढे लाभार्थी दत्तक घ्यावेत अशी आमची अपेक्षा आहे. त्यानुसार या योजनेला सध्या उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
[nggallery id=8]
८. मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजीत करणे.
आम्ही निवडलेल्या सर्व गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविणे तसेच आरोग्य शिबिरे घेऊन गरजवंतांना मोफत औषधोपचार करणे, तसेच नेत्रशस्त्रक्रिया व दंत उपचाराची गरज असलेल्या लाभार्थीची निवड करून त्यांचे वरती मोफत शस्त्रक्रिया हि केली जाते. त्यानुसार खामगाव येथे आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी व उपचार शिबिराद्वारे ७३५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून गरजूंना औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.मोतीबिंदू असणार्या लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
[nggallery id=9]
९. भगवंत महोत्सव (गावची जत्रा) साजरा करणे.
जगातील एकमेव असे असणाऱ्या बार्शीतील भगवंत मंदीरामध्ये दरवर्षी भगवंत जयंतीचा उत्सव भगवंत देवस्थान कमिटी त्यांचे पद्धतीने साजरा करीतच होती मात्र त्याला गावची जत्रा म्हणून भव्य स्वरूप यावे आणि शहरातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा म्हणून प्रतिष्ठानने सलग चार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार पहिले तीन दिवस व्याख्यानमाला व प्रकटदिनाचे दिवशी महाप्रसाद असा कार्यक्रम करण्याचे ठरविले. २०१५ साली सुमारे १० हजार व २०१६ साली सुमारे १२ हजार लोकांना अन्नदान करण्यात आले. त्यामध्ये बार्शी शहरातील व तालुक्यातील दानशुर व्यक्तींचा व संस्थांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.
[nggallery id=6]
१०. बौध्दिक व्याख्यानमाला आयोजीत करणे.
भगवंत जयंतीचे औचित्य साधुन सलग तीन दिवस समाजातील प्रतिष्ठित व्याख्यात्याचे व्याख्यान आयोजित केले होते, आणि त्याद्वारे बार्शी शहरातील नागरिकांना बौद्धिक मेजवानी देण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यानुसार २०१६ सालामध्ये बी.व्ही.जी.ग्रुपचे हनुमंत गायकवाड प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
अर्थक्रांतीचे जनक मा.श्री.अनिल बोकील सर व ज्येष्ठ पत्रकार मा.श्री.यमाजी मालकर साहेब यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यांनी देशामध्ये करप्रणालीचे पुनर्गठन करून देशाची आर्थिक घडी मजबूत कशी होऊ शकते याचे विवेचन केले ते बार्शीकरांना खूप भावले.
वरील व्याख्यानाचे आयोजनाचा आर्थिकभार श्री.भगवंत मल्टीस्टेट क्रेडीट को.-ऑप. सोसायटी लि.बार्शी यांनी उचलला आहे.
टीप: शुद्धपाणी पुरवठा योजनेमध्ये जी गावे प्रतिसाद देतात त्या सर्व गावांना वरील सर्व योजनांचा लाभ दिला जातो.
[nggallery id=10]
अन्नपुर्णा योजनेचा उद्घाटन समारंभ
मातृभुमी प्रतिष्ठानचा महत्वकांक्षी प्रकल्प अन्नपुर्णा योजनेचा उद्घाटन समारंभ रविवार दि.२४ जुलै,२०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता मा.श्री. हरकचंद सावला, मा.श्री.प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
[nggallery id=12]
वरील सर्व कार्याचा आर्थिक भार एकटी मातृभूमी प्रतिष्ठान हि संस्था उचलू शकत नाही. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी मातृभूमीच्या कार्यास साधाल हाताने मदत करावी म्हणजे हे कार्य अव्याहतपणे चालू राहील. कळावे हि विनंती.